भविष्यकथन करतांना ज्योतिर्विदाला अनेक प्रकारचे अनुभव येतात. आजपर्यंत आम्ही पाहिलेल्या हजारो कुंडल्यांमुळे हजारो व्यक्तींशी संपर्क आलेला आहे. त्यातले काही गमतीदार अनुभव.
१) एका वृद्ध बाईंनी आमची अपॉईंटमेंट घेतली होती. त्या देखील स्वामींची सेवा करतात. त्या सकाळी ११ वाजता फोन करणार होत्या. आम्ही आधीची कन्सलटेशन्स उरकून बरोब्बर ११ वाजता त्यांच्या फोनची वाट पहात होतो. सव्वा अकरा वाजून गेले तरी त्यांचा फोन नाही. अकरा वीस झाले. पुढच्या अपॉईंटमेंट दिलेल्या.
शास्त्रात असा संकेत आहे की, ज्योतिषाने कुणाला बोलवायला जाऊ नये. जातक ज्या वेळेस ज्योतिषाकडे स्वतः जातो त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट्स त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असतात. त्यामुळे आम्ही कुणाला फोन करुन " या हो, तुमचं भविष्य सांगतो" किंवा " आपली अपॉईंटमेंट ठरली होती" हे सांगायला जात नाही.
अकरा पंचवीसला त्या बाईंचा फोन आला. म्हटलं, " अहो आपली अकराची वेळ ठरली होती. तुम्ही आत्ता फोन करताय. आत्ता अकरा पंचवीस झालेत."
त्या म्हणाल्या, " अहो काय करणार. अकरा वाजता घरी मोलकरीण आली ना. त्यामुळे विचार केला की तिचे झाल्यावरच तुम्हाला फोन करू." :)
आम्ही कपाळाला हात लावला. काय बोलणार? त्या बाई स्वामींची सेवा करतात. म्हणून दिलं सोडून.
२) एका आयटी प्रोफेशनल गृहस्थाला आम्ही एक मंत्र दिला होता. त्या मंत्राची साधना कर म्हणून सांगितले. साधारण दोन आठवड्यांनी त्याचा फोन आला. म्हणाला,
" अहो पंत, तुम्ही दिलेल्या मंत्राचा मी रोज जप करतोय पण काही रिझल्ट्स मिळाले नाहीत अजून."
आम्ही विचारले की, " किती दिवस झालेत तुला मंत्राची साधना सुरू करून?"
तो म्हणाला, " ऑलमोस्ट टू वीक्स" :)
त्याचे ते ऑलमोस्ट टू वीक्स हे वाक्य आठवले की अजून हसू येतं. असा ऑलमोस्ट टू वीक्स मध्ये एक एक मंत्र फळला असता तर आम्ही एव्हाना स्वर्गात असायला हवे होतो.
आमच्या घोट्याची सालटी निघालेत जपाला मांडी घालून बसून.
३) एका केपी शिकलेल्या विद्यार्थ्याचा एकदा फोन आला. त्याच्याकडे एक विवाहाच्या प्रश्नाची कुंडली आली होती. विवाहयोग केव्हा, वैवाहिक सौख्य कसे मिळेल असे प्रश्न होते. याने कुंडली बनवून पाहिली पण त्याला निश्चित अनुमान घेता येत नव्हते. त्याने आम्हाला फोन केला व फोनवर कुंडली एक्सप्लेन केली.
आम्ही प्रश्न विचारत होतो, " सप्तमाचा सबलॉर्ड कोण आहे? कुठली स्थाने देतोय? महादशास्वामी कोण? अंतर्दशास्वामी कोण?" तो आमच्या प्रश्नाची उत्तरे देत होता. तो उत्तरे देत असतांना आमच्या डोक्यात ती कुंडली तयार होत होती.
आम्हांला पाहिजे असलेली कुंडलीबद्दलची माहिती त्याला विचारल्यावर आम्हांला उत्तर मिळाले होते. पण तो काय म्हणतोय, त्याचा निष्कर्ष काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला विचारले की,
" मग तुझे मत काय आहे? होईल की नाही तिचा विवाह?"
तो म्हणाला, " काय आहे पंत, काही पॉझिटिव्ह आहे आणि काही निगेटिव्ह आहे."
म्हटलं, " मग तू त्यांना काय सांगणार? विवाह होईल असे सांगणार, की विवाह होणार नाही असे सांगणार, की झाला तर होईल असे सांगणार?" :)
४) काही लोकांना काही विचित्र सवयी असतात. देवळात गेल्यावर दानपेटीत पैसे अर्पण करतांना हातात नाणी घेऊन ती देवावरून ओवाळतात. काही जण दर्शन घेऊन बाहेर आले तरी उजवा हात स्वतःच्या कपाळाला आणि छातीला लावत आठ दहा वेळा नमस्कार करत बसतात. काही जण स्वतःचे कान धरून देवळात उठ्याबश्या काढतात.
काही जण जप करतांना तर्जनी वापरतात. काही जण प्रदक्षिणा घालतांना अशा वेगात धावतात की कळत नाही दर्शनाला आलेत की मॅरेथॉनला. अनेक जण मध्यमेने म्हणजे मधल्या बोटाने गंध लावतात.
एका मुलाच्या साखरपुड्याला गेलो होतो. त्यांच्या सासरेबुवांनी त्याला गंध अक्षता लावतांना मधले बोट गंधात बुडवले. आम्ही म्हटले, " अहो तो जिवंत माणूस आहे. तो काही श्राद्धाचा पिंड नाही त्याला मधल्या बोटाने गंध लावायला." ते "सॉरी सॉरी" म्हणत ओशाळवाणे हसले. अशा क्रिया पाहून फार आश्चर्य वाटतं.
एकदा आम्ही मठात गेलो असतांना आमचे एक जातक तिथे आले होते. त्यांना स्वामीसेवा करण्यास आम्ही सांगितले होते. दुसर्या दिवशी आम्ही जायच्या वेळेस ते मठात दर्शनाला आले. मनात म्हटलं, " चला, यांनी चांगलं मनावर घेतलेलं दिसताय."
तेवढ्यात त्यांनी हातात दहा रुपयांची नोट घेऊन स्वामींवरून ओवाळायला सुरूवात केली. आम्ही विचारले, " अहो हे काय करताय? स्वामींवरून उतरवून टाकताय की काय? त्यांना काही बाधा झालेली नाही."
त्यांनी नैवेद्याला पुरणपोळ्या आणल्या होत्या. स्वामींना पुरणपोळी फार आवडायची. म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य स्वामींना दाखविण्याची प्रथा आहे. गजानन महाराजांना झुणका भाकर आणि त्याबरोबर हिरव्या मिरच्या खूप आवडायच्या. म्हणून गजानन महाराजांना त्याचा नैवेद्य दाखविला जातो.
तर त्या गृहस्थांनी आणलेल्या पुरणपोळ्यांकडे बोट दाखवून आम्ही म्हणालो, " आता ह्या नका ओवाळू त्यांच्यावरून म्हणजे मिळवलं."
असले मूर्खपणाचे चाळे म्हणजे भक्ती नव्हे.
आपला,
(अचंबित) धोंडोपंत
गिरीश कांबळे

