मी भांडवलवादी आहे. मी बिग बझारमधे जातो. मी जागतिकीकरणाला पाठिंबा देतो. मला नवनवीन उत्पादनं वापरायला आवडतात.
हे सगळं कबूल केल्यावर मला पडलेला प्रश्नही सांगतो. हे सगळं कशासाठी? यामुळे आपण खरोखरच सुखी होऊ का? आणि भांडवलवाद न येता समाजवाद राहून आपण सुखी झालो असतो का?
मला पुलंच्या 'असा मी असामी' मधलं वाक्य आठवतं - 'मला न कळणारे शब्द पाठ करून मी काय मिळवलं आणि न कळणारी गाणी पाठ करून शंकर्याने काय गमावलं हे मला कळत नाही'. कुठलाही इझम आला आणि कुठलातरी इझम गेला म्हणून समाजातल्या एकंदत सुखात काय फरक पडतो?
आजच्या जगातलं सुबत्तेचं मोजमाप म्हणजे अमेरिका. अमेरिकेत सुबत्ता आहे, ऐश्वर्य आहे, पण आपण असं छाती ठोकून सांगू शकतो का की अमेरिकन भारतीयांपेक्षा जास्त सुखी आहेत? आज माझ्याकडे नवनवीन भ्रध्वनी असतात, टीव्हींच्या पडद्याचा आकार वाढत चाललाय, मॉल्स, नवी सिनेमाघरं येतायत, पण मी माझ्या आजोबांपेक्षा जास्त सुखी आहे असं नाही वाटत. कारण साधं आहे. आजोबांच्या वेळी यातलं काही मुळी अस्तित्त्वातच नव्हतं! आपण दुसर्याकडे जास्त चांगल्या (?) गोष्टी बघतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी कमी असल्याची जाणीव होणार ना?
आणि मान्य, आजोबांच्या वेळी चांगल्या वैद्यकीय सुविधा नव्हत्या, चांगल्या वाहतुकीच्या सोयी नव्हत्या, इ.इ. पण आजोबांच्या वेळी अपघात करायला वेगवान गाड्याही नव्हत्या आणि आजोबांना पोट भरण्यासाठी पंचक्रोशीच्या बाहेर कधी जावंच लागलं नाही!
आपण चांगल्या, अधिक चांगल्या, सर्वांत चांगल्या वस्तूंच्या पाठी धावायचं, त्यासाठी कचेरीत कामाच्या पाठी धावायचं, करीयरच्या पाठी धावायचं, आणि एवढं सगळं करून मी ३२ इंचाचा टीव्ही घेतो तेव्हा ४२ इंचाचा टीव्ही बाजारात आधीच आलेला असतो! सगळीकडे स्पर्धा, ईर्षा, त्वेष… स्पर्धेचा एक गुण आहे - ती प्रत्येक स्पर्धाकाची गुणवत्ता वाढवते - पण इथे 'प्रत्येक' शब्द महत्वाचा. कारण त्यामुळे स्पर्धा कधीच संपत नाही. प्रत्येकाला सतत धावत राहावं लागतं. कारण तुम्ही धावत असता तेव्हा इतर स्पर्धकही धावत असतातच. तुम्ही 'five point someone' वाचलंय का? त्यात लेखक म्हणतो - 'everyone was trying to get marks higher than the average thereby pushing the average up!' प्रत्येकजण सरासरीच्या अधिकाधिक पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे फक्त सरासरी वाढते. आणि त्यासाठी करावे लागणारे कष्ट वाढतात! तुलनात्मक यश प्रत्येकाचं तेच राहातं!
मग एवढी कटकट कशाला? जिवाचा एवढा आटापिटा कशाला? सुख जर संध्याकाळी पडवीत खुर्चीत बसूनही मिळवता येत असेल तर त्यासाठी आपण एवढी धावाधाव का करतो?
मला याचं उत्तर मिळालेलं नाही. आणि यातून का बाहेर पडायचं याचंही नाही. तुम्हाला मिळालंय?