॥ श्री स्वामी समर्थ॥

लोकहो,
दिनांक ०५ जुलैचा दिवस. त्या दिवशी विरोधी पक्षांनी "भारत बंद" चे आवाहन केले होते. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. आम्ही सायकांळी साडेपाच वाजता, दिव्या सावंतची पत्रिका पाहून झाल्यावर संगणक बंद केला. संध्याकाळी पाच नंतर कुठलाही बंद समाप्त होतो आणि लोक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे साडेपाच नंतर तयारी करून घराबाहेर पडायचे, असा विचार होता. तेवढ्यात अमृतचा फोन आला.
म्हणाला, " पंत, माझं तुमच्याकडे एकदम अर्जंट काम आहे. मी येऊ का आत्ता दहा मिनिटात?"
आम्हाला कळेना याचे अचानक काम काय आहे. त्याला म्हटले, " दहा मिनिटात पोहोचू शकत असशील तर ये. आम्हाला बाहेर जायचे आहे. कुठे आहेस तू आत्ता?"
"मी घराखालूनच बोलतोय. निघतो लगेच. गाडी घेऊन येतो म्हणजे पाचव्या मिनिटाला तुमच्या घरी." असे म्हणत त्याने फोन ठेवला. तो आमच्या घरापुढे दोन सिग्नलवर राहतो.
आम्ही पुन्हा संगणक सुरू केला आणि अमृतचा प्रश्न काय असेल? हा विचार करत त्या वेळेची रुलिंग कुंडली उघडली. कुंडलीवर एक नजर टाकल्यावर एका क्षणात अमृत एखाद्या पोरीच्या लफड्यात आहे, हे आमच्या लक्षात आले.
तो पर्यंत अमृत आला. तो घरात पाऊल ठेवताच आम्ही त्याच्यासमोर,
"कह दो ना....... कह दो ना...... यू आर माय सोनिया"
हे गाणे गुणगुणत त्याला हसतहसत विचारले, " काय रे, बरोबर ना?"
तो हसला आणि " सही पंत.... सहीऽऽऽ" असे ओरडला.
त्याला घेऊन आमच्या खोलीत गेलो. संगणकासमोर बसल्यावर त्याला विचारले, " बोल. काय म्हणतेय तुझी सोनिया?"
त्याने सांगितलेली हकीगत अशी:-
गेल्या वर्षापासून (ऍकेडमिक ईयरपासून) म्हणजे हा एस वाय बी कॉमला असतांना त्याच्याच वर्गातल्या एका मुलीच्या प्रेमात पडला. हल्लीच्या बर्याच मुली मुलांना झुलवतात असा अनुभव आहे.
पूर्वीच्या मुली एका फटक्यात एकतर "हो" किंवा "नाही" म्हणायच्या आणि तिथे ऑन द स्पॉट प्रकरणाचा निकाल लागायचा. काही जणी तर " तुला शोभतं का हे असं मला विचारायला?" असे मुलांनाच उलट विचारायच्या.
हल्ली बर्याच मुली अशा वागतात की धड "हो" नाही आणि धड "नाही" नाही. त्यामुळे बहुतेक मुलांना जजमेंट येत नाही, की नक्की काय तिच्या मनात आहे? त्यात असा एखादा "नवखा" असेल तर त्याची काय अवस्था होत असेल याची कल्पना केलेली बरी.
बदलत्या काळानुसार प्रेम या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. प्रेमासारखी नितांत सुंदर आणि पराकोटीची पवित्र भावना, पाश्चात्यांच्या प्रभावामुळे कॅज्युअल रिलेशनशिपच्या हिणकस पातळीवर आली आहे. राहणीमान बदलले आहे. वेशभूषा, केशभूषा बदलली आहे. सुसंस्कृतपणाची जागा प्रोफेशनॅलिझमने घेतली आहे.
गेल्या आठवड्यात सौभाग्यवतींना हापिसात सोडायला जात असतांना पोर्तुगीज चर्चच्या सिग्नलला उभे होतो. समोरून गाडीच्या डाव्या बाजूने, घट्ट जीन्स-टीशर्ट घातलेली एक उफाड्याची मुलगी जात होती. तिच्या टी शर्ट वर लिहिले होते,
" Look at my face too "
आम्ही सौ. ना ते दाखवले. सौ. म्हणाल्या, " लाज कशी वाटत नाही या मुलींना असले कपडे वापरायला?"
आम्ही म्हटले," त्यांना लाज वाटते की नाही हे दूर राहिलं. मुळात त्यांच्या आईबापाला लाज कशी वाटत नाही, हे आम्हांला कळत नाही. मुलगी असले कपडे वापरतेय त्याचे आईबापाला काही वाटत नाही, त्यामुळे मुली अजून चेकाळतात. फालतूगिरीला आपल्या घरात थारा नाही, हे आईबापाने मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. आपल्या मुलांनी कधी असे कपडे आणले तर ते वापरायच्या आधी त्यांच्या कानाखाली आवाज निघतील."
अरे, ज्योतिषशास्त्राबद्दलच्या लेखात आम्ही हे काय लिहितोय? पण काय करणार. काही गोष्टी चीड आणणार्या असतात. त्या बोलल्या की बरं वाटतं म्हणून लिहिलं इतकचं. असो.
तर, अमृतने तिला गेल्या एप्रिलमध्ये एकदा प्रपोज केले. तिने हो म्हटले नाही आणि नाही देखील म्हणाली नाही. तिचा आहे तसा वावर कायम राहिला. हा बिचारा आकंठ तिच्यात बुडालेला. त्यामुळे जोपर्यंत ती ठामपणे नाही म्हणत नाही तोपर्यंत हा बाहेर यायला तयार नव्हता.
या विवंचनेत काही महिने गेल्यावर, एकदा काय तो "फैसला" करावा, झालं हे खूप झालं, असे त्याला वाटायला लागले. त्यासाठी तो आमच्याकडे आला होता. प्रश्न साधा, सरळ, सोपा होता. इच्छित व्यक्तीशी प्रेमविवाह होईल का?
आम्ही त्याला नंबर द्यायला सांगितले. त्याने ४८ नंबर दिला. नंबर ऐकताच "ती नकार देईल" हे आम्ही त्याला सांगितले.
या नंबरात ४ आहे जे पंचमाचे व्ययस्थान आहे. म्हणजे प्रेमसंबंधांना विरोधी भूमिका घेणारे आहे. त्यापुढे ८ जे मनस्ताप, नुकसान, हानी दाखवते आणि यांची बेरीज १२ जे सर्व गोष्टींचा व्यय दाखवतं.
अमृतने ४८ नंबर दिल्यावर आम्ही कुंडली पाहिली. कुंडलीतील चंद्र जातकाच्या मनातले विचार दाखवतो. उपरोक्त कुंडलीत चंद्र पंचमातच आहे. तसेच नवमांशातही पंचमात चंद्राचीच रास आहे. म्हणजे कुंडली प्रश्न व्यवस्थित दाखवते आहे. अमृतने प्रश्न मनापासून विचारला आहे.
नवमांश पंचमेश चंद्र स्वतः पंचमात असून तो मीन या द्विस्वभाव राशीत आहे. तसेच तो नवमेश आहे. चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध स्वतः अष्टमात मिथुन या द्विस्वभाव राशीत.
पुढे काहीच पहायला नको.
आम्ही अमृतला तिचा नाद सोडायला सांगितले. " ती तुला होकार देणार नाही. अशीच झुलवत ठेवणार. तिच्या मागे लागून तू स्वतःचे करिअर बिघडवून घेशील. सरळ बाजूला हो आणि सी ए फायनल आणि टी वाय बी. कॉमच्या परीक्षांचा अभ्यास सुरू कर. ही तुझी सोनिया नाही." असे म्हणालो. अमृतने विचारले, " पंत, हिच्या कॅरेक्टरबद्दल काही सांगता येईल का?"
खरं तर या प्रश्नाचे उत्तर एका सेकंदात देता येईल, हे ज्योतिर्विद वाचकांच्या लक्षात आले असेलच. पण जिच्याशी आपला संबंध नाही तिच्या कॅरेक्टरबद्दल आपण कशाला भाष्य करा? ज्या व्यक्तींशी आपल्या जातकांचा संबंध नाही त्यांच्या कॅरेक्टरची आपण चिवडाचिवड करू नये.
त्यांनी कसे जगावे हा त्यांचा अधिकार आहे. जोपर्यंत आपला त्यांच्याशी संबंध येत नाही तोपर्यंत कुणाच्याही कॅरेक्टरच्या भानगडीत आपण पडू नये.
म्हणून अमृतला एवढेच म्हटले की, "तुला काय करायचे आहे त्याच्याशी? तुझे लग्न जर तिच्याशी होणार असते तर तिचे कॅरेक्टर कसे आहे वगैरे गोष्टी आपण पाहिल्या असत्या. जिच्यासोबत तुला आयुष्य काढायचे नाही तिच्या कॅरेक्टरशी तुझा संबंध काय?"
तो म्हणाला, " मी तिला फायनल एकदा विचारणारच आहे आणि तेव्हाच तिचा डिसिजन तिथेच घेणार आहे. तीन महिने उलटले आत्तापर्यंत तिला हो किंवा नाही म्हणायला पुरेसा अवधी दिला आहे. तिने नकार दिला तर प्रश्नच नाही. पण जर तिने तेव्हा होकार दिला तर हा प्रश्न उद्भवेलच. म्हणून विचारले."
आम्ही म्हटले, " ती तुला होकार देईल हा तुझा भ्रम आहे. तू विचार तिला पुन्हा. पण तिच्या कॅरेक्टरबद्दल खोलात जाण्याचा प्रश्न तुला उद्भवणार नाही."
त्यावर तो म्हणाला, " पंत, एखादा चांगला मुहूर्त काढून द्या. त्या दिवशी तिला विचारतो. बघू काही पॉझिटिव्ह झालं तर."
म्हणजे आम्ही एवढं नकारात्मक भाकीत ठामपणे सांगूनही त्याच्या मनातली ती आशेची ज्योत काही विझत नव्हती. प्रेम आंधळं असतं आणि बुद्धी लंगडी असते असे म्हणतात. म्हणून बुद्धीला प्रेमाच्या खांद्यावर बसवावे म्हणजे प्रेमाचे पाय आणि बुद्धीचे डोळे यांनी वाटचाल व्यवस्थित होते. असो.
आता खरे तर अमृतला मुहूर्त काय काढून देणार? ज्याची परिणती नकारात्मक आहे हे माहित आहे, त्यासाठी कितीही चांगला मुहूर्त दिला तरी ते सकारात्मक होईल काय?
समजा एखाद्याला ५/८/९/१२ ची मजबूत दशा सुरू आहे आणि तो नवीन उद्योगधंदा सुरू करण्यासाठी मुहूर्त मागायला आला. त्याला अगदी उत्तम मुहूर्त काढून दिला म्हणून त्याचा धंदा चालणार आहे का? त्याचे अधःपतन होणार हे लिहिलेले आहे. त्याला मुहूर्ताने काय फरक पडणार आहे?
पण हे सर्व सांगून अमृतला पटले नसते. म्हणून आम्ही अमावास्येनंतर चंद्र लाभात गेल्यावर हस्त नक्षत्रावरचा दिवस सांगितला. वर " हा मुहूर्त फळणार नाही. पण तुला कंड म्हणून हा देतोय." हे ही सांगितले.
त्याप्रमाणे अमृतने त्या दिवशी तिला विचारले. तिने ठोस उत्तर देण्याची तेव्हाही टाळाटाळ केली. काय बनेल पोरगी असेल कल्पना करा. अमृतने तिला, "तुझा होकार किंवा नकार एक काय ते सांग म्हणजे मी मोकळा होईन" असे सांगताच,
" अजून दोन तीन वर्षे मला कुठल्याही बंधनात अडकायचे नाहीये." असे उत्तर तिने दिले.
"कह दिया..... कह दिया....... आय ऍम नॉट सोनिया"
अमृतने आम्हाला लगेच ही गोष्ट कळवली. आम्ही त्याला, "सुटलास. आता अभ्यासाला लाग." असे सांगून शुभेच्छा दिल्या.
अमृत म्हणाला," पंत, तुम्ही एका मिनिटात काय होईल हे बरोब्बर सांगितलं होतं हो. तेव्हापासून माझं एवढ्या दिवसांचं टेन्शन गेलं. नाही झालं काही यातून हेच चांगलं झालं. "
पत्रिकेवर नजर टाकताच आम्हांला अशी एका मिनिटात जजमेंट येते, ही खरेतर स्वामींची कृपा. स्वामीचरणी दंडवत.
आपला,
(रत्नपारखी) धोंडोपंत